लेखन:
©मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख
आपल्याला हवी असलेली गोष्ट किंवा संधी देताना एखाद्या व्यक्तीनं आपल्याकडून काही अपेक्षा केली तर कुणाला त्यात काही गैर वाटण्याचं कारणच नाही. पण कुणी काय मागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि आपण त्याची कोणती मागणी पुरवावी- कोणती मागणी पुरवू नये, हा आपल्या तारतम्याचा प्रश्न असतो. एखाद्यानं पैसे, प्राॅपर्टी मागितली तर आपण त्याला भ्रष्टाचार म्हणतो. पण जर त्याच व्यक्तीनं आपलं शरीर मागितलं तर?
कुणीही व्यक्ती अगदी चारचौघात चौकात उभी राहून अशी मागणी करायला धजावत नाही, हा झाला पहिला भाग. आणि दुसरा भाग म्हणजे, ‘दिसली बाई की कर मागणी’ असंही होत नसावं. आपण एखादं काम मिळवण्याकरिता वाट्टेल ती किंमत मोजायची असं मनातून ठरवलेलंच आहे, हे समोरच्याला कळू नये इतका कुणी दूधखुळा नसतो. समोरच्या व्यक्तीला आपल्यामध्ये अशी काही ‘विशिष्ट आशा-महत्वाकांक्षा’ दिसली की, ‘मी टू’ सारखी प्रकरणं घडायला वेळ कशाला लागतोय?
“माझ्यावरही असा शारीरीक अत्याचार अमुक अमुक वर्षांपूर्वी झाला होता” असं आज थेट कॅमेऱ्यासमोर येऊन म्हणावंसं का वाटतंय? आणि अशी गोष्ट इतक्या वर्षांनंतर जाहीर करण्याचं कारण काय असावं, याचा शोध घ्यावा असं कुणालाही वाटतच नाहीय. समाजातल्या सर्वसामान्य, सरळ मार्गानं आयुष्य जगू पाहणाऱ्या, पापभिरू माणसाला एकही श्वास आनंदानं, सुखासमाधानानं घेताच येऊ नये अशीच योजना मुद्दाम केली गेली आहे का? समाजाला सतत अशांत, अस्थिर आणि मानसिकदृष्ट्या दडपणाखाली ठेवण्याचं हे षडयंत्रच आहे की काय, अशी दाट शंका येते.
‘रावसाहेब’ या व्यक्तिचित्रात पु.ल. म्हणतात, “रावसाहेबांना जतन करावासा वाटणारा कुळधर्मच निराळा होता. या माणसाला स्टेजवरच्या रूक्मिणी सुभद्रेचा पदर ढळलेला काही चालत नसे. “हे कसलं हो रूक्मिणी? हे काय बेळगावच्या बोगारवेशीत राहत होतं का काय हो ? ते नारायणराव बालगंधर्व खरं बाई नव्हतं, तरी पदर कसा घट्ट ठेवायचं. आणि काय हो हे आता? थू:..”
रावसाहेबांचा जमाना कधीच गेला. आज पुरूषांनाच बायकांच्या पोशाखात रोज टिव्ही वाहिन्यांवर येऊन काॅमेडीच्या नावाखाली सतत पदर पाडून वावरण्याची हौस निर्माण झाली आहे. घराघरातून हे असलं वावरणं विनोदाच्या नावाखाली सर्रास खपवलं जातंय, यावर कुणी चकार शब्द काढायला तयार नाही.
खाजगी आयुष्यात, पूर्ण एकांतात असतानाही, स्वत:च्याच पतीसोबतदेखील शारिरीक जवळीक मोकळेपणाने साधू शकत नसणाऱ्या स्त्रियांपासून ते ‘बघा बघा माझं शरीर’ असं म्हणत अंगप्रदर्शन करणाऱ्या आणि दर चार दिवसांनी बाॅयफ्रेंड बदलणाऱ्या स्त्रियांपर्यंत सांस्कृतिक महाराष्ट्राचा प्रवास फार वेगानं झाला आहे. महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था सुधारावी, पर्यटन व्यवस्था सुधारावी, रोजगार व्यवस्था सुधारावी, महाराष्ट्र हे जागतिक स्तरावरचं उत्कृष्ट वाचनसंस्कृती असणारं राज्य व्हावं या पैकी कोणत्याही कारणासाठी महाराष्ट्राचा प्रवास अशा वायुवेगानं कधीच झाला नाही. पण ‘मी टू’ सारखी प्रकरणं चवीनं चघळण्याकडे मात्र महाराष्ट्र रममाण झालेला आहे.
लग्नाला सात-आठ वर्षं झाली आहेत, पदरात दोन मुलं आहेत, संसार सुरळीत सुरू आहे, अशी एखादी महिला जर ‘मी टू’ म्हणाली तर तिच्या वैवाहिक आयुष्याचं काय मातेरं होईल, याची कणभरतरी कल्पना आपल्याला आहे का? एखादं शरीर उपभोगलं आणि काम संपल्यावर सोडून दिलं, एवढाच शरीरसंबंधाचा मर्यादित अर्थ असतो का? अनेक वर्षांपूर्वी असा प्रसंग घडला होता, तेव्हा आपली त्या संबंधांना संमती होती की नव्हती? जर संमती नव्हती तर तेव्हा समोरच्या व्यक्तीची अशी मागणी पूर्ण का केली? ‘माझं शरीर त्या व्यक्तीच्या हाती स्वाधीन करण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता’ इतकी कुठली आणीबाणीची वेळ या महिलांवर आली होती? काम मिळवण्यासाठी समोरच्या माणसाशी स्वत:च्या शरीराचा आणि पर्यायाने चारित्र्याचाच सौदा करावा, असं त्या महिलेला त्या क्षणी का वाटलं असेल?
गीतकार जगदीश खेबूडकरांनी ‘पिंजरा’ चित्रपटासाठी एक अत्यंत सुंदर अर्थपूर्ण गीतरचना केली आहे. ‘सत्त्वशील चारित्र्याची घालमेल झाली’ असं ते लिहीतात. ‘मी टू’ प्रकरणातल्या या महिलांची खरोखरच घालमेल झाली असेल का हो? एका प्रतिष्ठीत माणसाचं केवळ सूडबुद्धीपोटी चारित्र्यहनन कसं केलं जातं आणि त्या गुणवान माणसाची पुढं कुत्र्याइतकीही किंमत उरत नाही, याचा भेदक प्रवास या चित्रपटात दिसतो. आपण निष्कलंक चारित्र्याची किंमत समजूनच घेऊ शकलो नाही का, हा प्रश्न आपणच आपल्याला विचारणं आता अपरिहार्य झालं आहे.
पंढरपूरच्या श्रीविठ्ठल मंदिरात संत कान्होपात्रेची समाधी आहे. “प्रत्यक्ष पांडुरंगाच्या सानिध्यातच समाधिस्थ झालेली सर्वात भाग्यवान संत” असंच संत कान्होपात्रेचं वर्णन करायला हवं. कान्होपात्रा कोण होती? याची माहिती घेतली की, आताच्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपोआपच मिळतील. साक्षात भगवंतानंसुद्धा जिला सतत स्वत:च्या सानिध्यात ठेवावं इतकं सामर्थ्य स्वत:च्या चारित्र्यात असणारी कान्होपात्रा होती कोण? ते नीट जाणून घेतलं पाहिजे.
आपली बुद्धी आणि सारासारविवेक दोन्हीही जागं ठेवून विचार केला तर असं स्पष्ट दिसेल की, “मी टू” प्रकरणात संमतीचा भाग मोठा आहे. केवळ शारीरिक भूक भागवणं वेगळं आणि स्वत:ला काहीतरी मिळवायचंय म्हणून समोरच्याची शारीरिक भूक आपण आपलं शरीर देऊन भागवणं वेगळं. दोन्हीतल्या भावनिक गुंतवणुकीची आणि दोन्हीमागील हेतूची तुलना होणं शक्यच नाही. या सगळ्या प्रकरणांमधला एक दुर्लक्षित भाग असा आहे की, मागणी करणाऱ्यानं ताकाला जाऊन भांडं लपवण्याचा उद्योग केलेला नाही. त्यानं खाजगीत अगदी स्पष्टपणेच मागणी केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याचाच अर्थ असा होतो की, मागणी करणाऱ्याच्या अपेक्षा अगदीच स्पष्ट होत्या आणि आपली मागणी समोरची व्यक्ती नक्कीच पूर्ण करेल याविषयीची खात्रीही असणार.
अशा प्रकरणांमध्ये गुंतलेले पुरूष किंवा स्त्रिया आधी समोरच्या व्यक्तीला चाचपून पाहतील आणि मगच असलं धाडस करतील, हे साधं सरळ लाॅजिक आहे. वर्तनाचा जुजबी अभ्यास असणारा कुणीही हे सहज सांगू शकेल की, कुणाहीकडे त्याच्या शरीराची मागणी करणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. किंबहुना अशा बाबतीत ही माणसं नेहमीपेक्षा कितीतरी अधिक सावध आणि चोखंदळ असतात. आपल्या मागणीला कोण बळी पडू शकेल, कुणाला सहजपणे ब्लॅकमेल करता येईल, कुणाला आमिषं दाखवता येतील, कुणाला स्वप्नं दाखवता येतील याचा परफेक्ट अभ्यास केलेलाच असतो. थोडक्यात म्हणजे, आपला आपल्या स्वत:विषयीचा जितका अभ्यास नसतो तितका इतरांचा आपल्याविषयीचा अभ्यास असतो. म्हणूनच, आपल्या वागण्या-बोलण्यातून समोरच्याला नेमकं काय दिसतंय, जाणवतंय याचाही अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे, असं मानसशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला वाटतं.
सुरक्षिततेला शिस्तीचं कोंदण लागतंच. आपल्याला सुरक्षितता हवी असेल तर आपण तसं वागावंही लागतं. “साहब, हम लोग गरीब हुए तो क्या हुआ? लेकिन हम इज्जतदार लोग है, इज्जत से अमीर है” हा डायलाॅग आताशा सिनेमांमधूनही पहायला-ऐकायला मिळत नाही. कारण, भौतिक गोष्टींपुढं चारित्र्याची किंमत कमीच वाटायला लागली. एवढा मोठा गंभीर बदल समाजाच्या वागण्याबोलण्यात घडून गेला पण आपल्याला त्याचा पत्ताही लागला नाही.गरीब किंवा असहाय्य स्त्रिया आजही पूर्ण सुरक्षित नाहीतच. पण ‘मी टू’ मध्ये असणारा स्त्रीवर्ग असा नाहीय. त्यांचा आर्थिक-सामाजिक स्तर वेगळा आहे.
या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्यांची तर आता फारच पंचाईत झाली आहे. सामान्य घरातल्या एखाद्या मुलीनं जर मनोरंजन क्षेत्रात काम किंवा करिअर करायचं ठरवलं तर तिच्यासमोरच्या अडथळ्यांची मालिका आता ‘चार दिवस सासूचे’ पेक्षासुद्धा मोठी होणार आहे. त्याचं काय करायचं?
मला नेहमी एका गोष्टीचं राहून राहून आश्चर्य वाटतं आणि प्रश्नही पडतो. मनोरंजन क्षेत्रातील कोणत्याही सन्मान सोहळ्यात पुरस्कार स्वीकारताना मिठी मारून, गालाला गाल लावून मगच पुरस्कार स्वीकारला जातो. याच व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार मिळतो, तो सोहळा कसा असतो आणि त्यातलं यांचं वागणं कसं असतं, ते पहा. आपल्याला असं वाटेल की, राष्ट्रपती पुरस्कारांना विशिष्ट प्रोटोकाॅल्स असतात. बरोबरच आहे. मग ते प्रोटोकाॅल्स अन्य ठिकाणी का नसावेत? आपण प्रोटोकाॅल्स चा आग्रह जाणीवपूर्वक का धरू नये?
उद्या जर घरातल्या मुली ‘तुम्हाला अमुक अमुक हिराॅईन ने तसं वागलेलं चालतं, मग मी तसं वागले तर बिघडलं कुठं?’ असा वाद घालायला लागल्या तर प्रकरणं पालकांच्या हाताबाहेर जातील, हे उघड आहे. आज घराघरांमध्ये जे वाद मुलींच्या पोशाखांवरून होतात, उद्या तेच वाद याही गोष्टींवरून सुरू होतील. ते सोडवण्याचे मार्ग समाजाकडे आहेत का? ‘अमुक हिरो चारचौघात शर्ट काढून फिरतो, ते तुम्ही चवीनं पाहता. मग मी तसा फिरलो तर बिघडलं कुठं?’ असं म्हणत मुलं रस्त्यावर फिरायला लागली तर काय करायचं?
‘मी टू’ मधल्या गोष्टी नव्या, अनपेक्षित, धक्कादायक, मुळापासून हादरवणाऱ्या अशा नाहीतच. “सांगते ऐका” हे हंसा वाडकरांचं पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे. सेलिब्रिटी आणि सामान्य माणूस यांच्यातली दरी कुणी निर्माण केली आणि कुणी वाढवली, याचं उत्तर समाजाकडून घेतलं पाहिजे. समाजात जसे अन्य क्षेत्रातले व्यावसायिक किंवा नोकरदार आहेत, तशीच ही मनोरंजन आणि कला क्षेत्रातली माणसं आहेत. प्रतिभा केवळ यांच्यातच असते असं नाही, ती एखाद्या सुतारकाम करणाऱ्या कारागिरातही असतेच. पण आपण अन्य क्षेत्रातल्या प्रतिभावंतांना ग्लॅमर देतच नाही. सौंदर्याचे किंवा पुरूषीपणाचे दिखाऊ मापदंड तारे-तारकांकडे पाहूनच ठरवले जात असतील तर मग त्याची बोली लागणारच ना !
एखाद्या घरातल्या मोलकरणीवर असा प्रसंग आला आणि तिने पत्रकार परिषद घेतली, असं आजतागायत घडल्याचं आपण पाहिलेलं नाही. सामान्य व्यक्तीच्या बाबतीत असं काही घडलं की त्याकडे इतक्याच गांभीर्यानं पाहिलं जातं का? सामान्य माणसापेक्षा सेलिब्रिटीज् ना अधिक महत्त्व कशासाठी? आणि सेलिब्रिटीज् ना इतकं महत्त्व हवंच असेल तर ते समाजानं आवर्जून आपलं अनुकरण करावं, असं का वागत नाहीत?
आता माझ्यासारख्यासमोर प्रश्न उभा राहतो तो एवढाच की, ‘या मुद्द्याला अपार प्रसिद्धी देणं समाजाच्या हिताचं नव्हतं, हे प्रत्येक सुजाण माणसाला समजत असतानाही या प्रकरणाला इतकी प्रसिद्धी का देण्यात आली?’ ज्या गोष्टी कोवळ्या, अर्धवट कळत्या वयातल्या, किंवा अशा गंभीर विषयांचा आवाका समजण्याइतपत भान नसलेल्या पिढीसमोर मांडण्यातून सवंग प्रसिद्धीशिवाय काहीही हाती लागणार नाही, अशा गोष्टींच्या विविध माध्यमांमधून का फिरवल्या जात आहेत? राखी सावंत सारख्या व्यक्तीनं या विषयावर पत्रकार परिषद घ्यावी आणि ती देशभर दाखवली जावी, इतकं महत्त्वाचं असं काय होतं त्यात? राखी सावंत सारख्या व्यक्तीनं चारित्र्याविषयी बोलावं आणि त्यातही तिच्या भाषेनं कशाचंच भान ठेवू नये, हे सगळं मीडीयाने का दाखवावं? हा सगळा तमाशा घराघरात पोहोचला पाहिजे, अशी मीडीयाची इच्छा का आहे? आंबटपणाची आणि आचरटपणाची इतकी का प्रसिद्धी?
समाजाच्या भूमिकेचा मात्र पार शिमगाच झाला आहे. एका बाजूला ‘मी टू’ वर टीका करायची आणि दुसरीकडे ‘बाई वाड्यावर या’ सारख्या गाण्यांवर जाहीरपणे बेभान होऊन नाचायचं !!! समाजाला एकाच वेळी दोन्ही हातांमध्ये दोन्ही गोष्टी हव्या आहेत. माणसांचंही विचित्रच आहे. ‘मी टू’ बद्दलही ओरडणाऱ्याला द्व्यैअर्थी आयटम साॅंग्जमध्ये पण इंटरेस्ट असतो, सोशल मीडीयावर ‘मी टू’ प्रकरणाला दणदणीत पाठिंबा देणारे अनेकजण रास दांडिया च्या कार्यक्रमांमध्ये नेत्रसुख घेण्यासाठी जातात. आणि ही डबल ढोलकी वाजवतंय कोण? तर, मीडीया...!
ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली काहीही खपवून घ्यायला लोक तयार आहेत म्हटल्यावर वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याची संधी कोण सोडेल?
समाज सभ्य आणि सुसंस्कारित रहावा असं वाटत असेल तर काही गोष्टींपासून त्याला दूरच ठेवावं लागतं आणि काही गोष्टी अनिवार्य कराव्या लागतात. भंपक विषयांना नको तितकी हवा देऊन समाजात नवनवे प्रश्नच जन्माला घातले जात आहेत, पण यावरच्या उपायाविषयी जाहीरपणे कुणी काहीच बोलायला तयार नाही. कुणी असं का म्हणत नाहीय की, या विषयांना दिवसरात्र प्रसिद्धी देण्याचा उद्योग आधी बंद करा. यापेक्षा कितीतरी महत्त्वाचे आणि आवश्यक विषय दुर्लक्षित होऊन धूळ खात पडून आहेत, त्या विषयांचा पाठपुरावा करा आणि समाजाला प्रगतीसाठी उपयोगी पडेल अशा गोष्टी २४ तास लोकांच्या मनावर बिंबवत रहा. पण, असं सुचवणाऱ्यांना लांबच ठेवलं जातं.
उद्या जर घराघरातल्या स्त्रिया ‘मी टू - मी टू’ असं म्हणायला लागल्या तर त्यांच्या कुटुंबियांची काय अवस्था होईल, समाजात त्या विषयीची कोणती प्रतिमा तयार होईल, याची थोडीशी तरी कल्पना करायला हवी. तेवढंसुद्धा तारतम्य असू नये का?
मला ‘देऊळ’ आणि ‘पोस्टर बाॅईज’ या दोन सिनेमांची आवर्जून आठवण होते. देऊळ सिनेमात गावातल्या शाळेतला शिक्षक नित्यनेमाने रात्री त्याच्या मित्रांसोबत ब्लू फिल्म्स पहायला जात असतो, असं दाखवलंय. आणि पोस्टर बाॅईज मध्ये मंत्रालयातल्या एका महिला सेक्रेटरी ला साहेबांबरोबर ‘खास अभ्यास दौऱ्याकरिता’ परदेशी जायचं असतं, असं दाखवलंय. ‘त्या रात्री पाऊस होता’ हा सिनेमा जिज्ञासूंनी अवश्य पहावा. परस्त्रीकडे पाहण्याचे वासनांध दृष्टिकोन कसे असतात, हे त्यात स्पष्ट दिसेल. समाजात अशा प्रवृत्ती पूर्वीही होत्याच आणि आजही आहेतच. पण उद्या त्या प्रवृत्तींचं निर्माण होणं आटोक्यात आणायचं असेल तर ठोस कठोर भूमिका स्वीकारली पाहिजे.
स्त्री-पुरूष संबंधांमधलं चिरंतन सत्य काय आहे, हे जाणून घेतलं- समजून घेतलं तर मनातली वावटळ शांत होईल. स्त्री ने तिच्या सौंदर्याचा अभिमान अवश्य बाळगावा, पण त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला की ते तारण ठेवण्याची वेळ येतेच. पुरूषांनाही कामाच्या ठिकाणी किंवा समाजकारणात सामाजिक अंतर कसं राखावं, याचे धडे गिरवण्याची गरज आहे. शेवटी काय, खाजगी आयुष्य आणि सामाजिक आयुष्य यांच्यात फरक करण्यात यश मिळालं नाही तर पुरूष असो किंवा स्त्री, “मी टू” ला नसे अंत ना पार !
©मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख
आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे.