सकाळी सकाळी एक लहान मुलगा आमच्या दारात येऊन उभा राहिला .भाऊंना वाटले की तो कोणाचा तरी निरोप घेऊन सांगण्यासाठी आला असावा .कायरे कोणाकडून आला काय काम आहे म्हणून भाऊंनी त्याला विचारले .एक नाही दोन नाही तो आपला खाली मान घालून उभा .शेवटी भाऊंनी त्याला जरा ओरडून विचारले की तुला काय पाहिजे ?खाली मान घालून तो हळूच ऐकावयाला येईल न येइल एवढ्याच आवाजात म्हणाला मी काम करण्याला आलो आहे .भाऊंना वाटले की त्यांनी कोणातरी गड्याला कामाला बोलाविले होते त्याऐवजी त्याने याला कामाला पाठविले आहे .बोलता बोलता हळूहळू उलगडा झाला की तो आपणहून काम मिळेल म्हणून आला आहे .
चणीने लहान उंचीने बेताचा ,अत्यंत काटकुळ्या अंगाचा ,हाता पायाच्या काड्या ,काळा ,एक डोळा तिरळा, डोक्यावर बेताचे कापलेले केस, हातापायांच्या काड्या ,बावळट, वारा आला तर उडून जाईल अशी यष्टी, असे एकूण त्याचे रूप होते .त्याला नाउमेद करू नये म्हणून भाऊंनी सांगितले की तू चार दिवस काम कर व नंतर मी तुला किती पैसे द्यावयाचे ते काम बघून ठरवीन.त्या दिवसापासून तो कामावर रुजू झाला. विशेष बोलणे नाही. सतत काम करीत राहणार.कष्टाळू ,सकाळी सूर्योदयाबरोबर हजर, दुपारी व न्याहारीच्या वेळी फक्त एक तास घरी जाणार, उगीच शहाणपणा दाखवणार नाही, असे त्याचे एकूण वर्तन असे. इतर गडी त्याची थट्टा मस्करी करीत परंतु त्यावर तो फारसे काही बोलत नसे .त्याचे काम जवळजवळ दुसऱ्या गड्यांबरोबरीने होत असे.शिवाय गाजावाजा नाही.सर्व काही शांतपणे न बोलत.काही दिवस भाऊंनी त्याला इतर गड्यांपेक्षा थोडा कमी पगार दिला. परंतु नंतर त्याला इतरां एवढा पगार देण्याला सुरुवात केली. तो वयाने लहान वाटत होता. परंतु तसे नव्हते त्याची चणच लहान होती .त्याला कोणतेही व्यसन नव्हते इतर गडी पान खाण्यासाठी, तंबाखू मळण्यासाठी, वेळ दवडीत असत .संध्याकाळी बऱ्याच वेळा सर्वजण भडारवाड्यात जात व डुलतडुलत घरी पोचत.हा सरळ घरी जात असे. इतर गड्यांना निदान त्यांच्या बरोबर काम करण्यासाठी एक दोन गडी तरी लागत म्हणजे गप्पा मारीत मारीत काम करता येई ,बरोबरच घरी जाता येई व कामावर येतानाही बरोबरच येता येई, संध्याकाळी भंडारवाड्यात बरोबर जाता येई!
हा एकटा कामावर येत असे तुमचे लक्ष असो वा नसो तो आपले काम चोख करीत असे .
हळू हळू भाऊंचा तो आवडता लाडका गडी झाला .त्याला मोठ्या ताकदीचे काम जमत नसे. झाडांवर चढण्याचे कसब कमी प्रमाणात होते. आंबे काढताना आंब्याची पारख कमी प्रमाणात होती .सांगकाम्या होता. हुशारी कमी होती.थोडासा बावळटपणाकडे झुकणारा होता .त्याचे वय त्यालाही माहीत नव्हती इतर गडी तो त्यांच्या पेक्षा मोठा आहे असे सांगत.
त्याचे लग्न झाले.त्याच्या सारखीच त्याला लहानशी बायको मिळाली.तीही कामावर येत असे .त्याला मुलेबाळे ही झाली . एकूण त्याचे ठीकठाक चालले होते .पुढे पुढे तो थोडी दारूही पिऊ लागला .भाऊंनी पुढे त्याला गवत उगवणारा डोंगराचा आमच्या मालकीचा एक लहानसा भाग त्यांच्या नावावर करून दिला .वृद्धापकाळामुळे भाऊ माझ्याकडे येई पर्यंत तो मधूनमधून कामावर येत असे .मी जेव्हा जेव्हा गावी जाई त्यावेळी तो खाली मान घालून काम करताना दिसे.आमच्या आंबे काढणाऱया गड्यांच्या टोळीमध्ये आमच्याबरोबर तो नसे.काय विठ्ठल बरे आहे ना म्हणून त्याला विचारले की तो ठीक आहे प्रभाकर म्हणून उत्तर देई .या शिवाय त्यात माझा विशेष संबंध आला नाही .भाऊ इकडे आल्यावर माझेही गावाकडे जाणे स्वाभाविक पणे कमी झाले.मध्ये केव्हातरी गावाला गेलो होतो तेव्हा चौकशी केल्यावर विठ्ठल देवाघरी गेल्याचे कळले .देवाघरचा जीव देवा घरी पुन्हा गेला .केवळ त्याची आठवण राहिली .
२८/६/२०१८©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com