अथर्ववेदाच्या शाखा
अथर्ववेदाच्या नऊ शाखा उल्लेखिल्या जातात त्या अशा पैप्पलाद, तौद किंवा तौदायन, मौद किंवा मौदायन, शौनक, जाजल, जलद, ब्रह्मवद, देवदर्श, चारणवैद्य! या शाखांपैकी पैप्पलाद आणि शौनक या दोन शाखांच्या संहिताच आज उपलब्ध आहेत.
पैप्पलाद हे नाव पिप्पलाद नामक ऋषीच्या नावावरून आले आहे. पैप्पलाद शाखेचा प्रवर्तक हाच असावा. पैप्पलाद शाखेच्याअथर्ववेदसंहितेत एकूण वीस कांडे आहेत. ‘शं नो देवी:...’ या मंत्राने या संहितेचा प्रारंभ होतो. सत्तर वर्षांपूर्वी पैप्पलाद संहितेची एक प्रत काश्मीरमध्ये उपलब्ध झाली. ब्लूमफील्ड आणि आर्. गार्बे यांनी या संहितेच्या हस्तलिखिताचे संपादन केले आहे.
शौनकसंहितेत पैप्पलादसंहितेप्रमाणेच एकूण वीस कांडे आहेत. या संहितेत मुळात अठराच कांडे असावीत आणि १९ वे व २० वे कांड त्यांस नंतर जोडले गेले असावे, असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. या संहितेत ७३१ सूक्ते असून सु. ६,००० ऋचा आहेत. विसाव्या कांडातील बहुतेक सूक्ते ऋग्वेदातूनच घेतलेली आहेत.
अथर्ववेदाचा काळ काटेकोरपणे सांगणे अवघड आहे. तथापि तो ऋग्वेदकालानंतरचा आहे, ह्याची प्रमाणेअथर्ववेदात आलेल्या विविध विषयांच्या वर्णनांवरून मिळतात. आर्य गंगेच्या प्रदेशात स्थायिक झालेले दिसतात. भारताच्या पूर्व आणि आग्नेय दिशेकडे ते बरेच सरकलेले दिसतात. यमुना आणि वारणावती या नद्यांचे उल्लेख येतात. बंगालमधील दलदलीच्या प्रदेशात वावरणारा वाघ अथर्ववेदात प्रथमच दिसतो. आर्य आणि दस्यू यांच्यामधील भेदभाव तीव्रतर झाल्याचे आढळते. ब्राह्मणांचे महत्त्व वाढल्याचा प्रत्यय येतो. चातुर्वर्ण्य स्थिरावलेले दिसते. ऋग्वेदातील अग्नी, इंद्र इ. देवता येथेही दिसतात; परंतु राक्षसांचा नाश करणे एवढेच त्यांचे मुख्य कार्य झालेले दिसते. अथर्ववेदातील तत्त्वज्ञानपरिभाषाही बरीच विकसित झालेली आहे. मात्र अथर्ववेदातील सर्वच सूक्तेऋग्वेदसंहितेनंतरची नाहीत. अथर्ववेदातील काही भाग ऋग्वेदाइतकाच जुना आहे.
अथर्ववेदातील विविध विषय सर्वसाधारणपणे दहा वर्गात विभागले जातात. हे वर्ग पुढीलप्रमाणे:
(१) भैषज्यकर्मे
(२) आयुष्यकर्मे
(३) अभिचारकर्मे किंवा कृत्याप्रतिहरणकर्मे
(४) स्त्रीकर्मे
(५) सांमनस्यकर्मे
(६) राजकर्मे
(७) ब्राह्मणमाहात्म्य
(८) पौष्टिककर्मे
(९) शांतिकर्मे
(१०) विश्वोत्पती व अध्यात्म
भैषज्यकर्मे
विविध रोगांच्या निर्मूलनासाठी वापरावयाचे मंत्र यात आहेत. ज्वर, अतिसार, मूत्ररोध, नेत्ररोग, वातपित्तकफादी दोष, हृद्रोग, कावीळ, कोड, यक्ष्मा, जलोदर इ. रोगांसाठी रचिलेल्या या मंत्रांत भारतीय आयुर्वेदाची प्रारंभीची अवस्था दिसते.
बऱ्याचशा रोगांची निदाने अथर्ववेदात आणि आयुर्वेदात जवळजवळ सारखीच दिलेली आढळतात. जेष्ठीमध, दूर्वा, अपामार्ग म्हणजे आघाडा, पिंपळी, रोहिणी इ. रोगनाशक आणि आरोग्यकारक वनस्पतींचे उल्लेख अथर्ववेदात येतात. रोगनाशक वनस्पतींची स्तुती काही मंत्रांत आहे.
काही मंत्रांतून दिसणारी रोगनाशक उपाययोजना प्रतीकात्मक आहे. उदा., कावीळ बरी होण्याच्या दृष्टीने रोग्याच्या कायेवर आलेला पिवळा रंग पीतवर्णी सूर्यामध्ये मिसळून जावा, अशी कल्पना एका मंत्रात दिसते. रोग हटविण्यासाठी ताइतांचा वापरही सुचविला आहे. अस्थिभंगावर आणि जखमांवर काही मंत्र आहेत . त्यात अरुंधती, लाक्षा लाख आणि सिलाची यांचा उल्लेख येतो.
जंतू, राक्षस, गंधर्व, अप्सरा ही रोगांची कारणे म्हणून दाखविली जातात. जंतूंना मारून टाकण्यासाठी इंद्रासारख्या देवतेला आवाहन केले जाते. राक्षसांना पळवून लावण्यासाठी अग्नीची प्रर्थना केली जाते. कधीकधी ज्वर हा कोणी राक्षस आहे अशी कल्पना करून त्याला उद्देशून मंत्र रचिले आहेत .
गंधर्व आणि अप्सरा यांचे निवारण करण्यासाठी अजशृंगी नावाची वनस्पती उल्लेखिली आहे.
केशवर्धनासाठी अत्यंत चित्रमय भाषेत तीन मंत्र रचिले आहेत
भैषज्यसूक्तांतील मंत्रांत आलेल्या अनेक कल्पना प्राचीन जर्मन काव्यातील मेर्सेबर्गमंत्र, तार्तरशामान यांचे मंत्र आणि अमेरिकन इंडियन लोकांतील वैदूंचे मंत्र यांत आलेल्या कल्पनांशी मिळत्या-जुळत्या आहेत.
आयुष्यकर्मे
आयुर्वर्धनाचा प्रश्न विविध व्याधींच्या प्रतिकाराशी निगडित असल्यामुळे हे मंत्र भैषज्यसूक्तांपासून काटेकोरपणे वेगळे करता येत नाहीत. उदा., एकोणिसाव्या कांडातील ४४ वे सूक्त आयुर्वर्धनासाठी असले, तरी त्यात काही रोगांची यादी आलेली असून त्यांपासून मुक्तता व्हावी म्हणून आंजन या विशिष्ट औषधीला आवाहन केले आहे. हे आयुष्यमंत्र उपनयन, गोदान इ. गृह्यसंस्कारांच्या वेळी म्हटले जातात.
मृत्यूच्या १०० किंवा १०१ प्रकारांपासून संरक्षण मिळण्यासाठी केलेल्या प्रार्थना येथे आढळतात. या सर्व मंत्रांत अग्नीचे महत्त्व प्रकर्षाने आढळते. अग्नी जिवंतपणाचे प्रतीक आहेच. जीवनसंरक्षक ताइतांनाही येथे स्थान आहे. सोन्याचा ताईत, मेखला, शंखमणी यांचे उल्लेख आहेत.
अभिचार किंवा कृत्याप्रतिहरणकर्मे
शत्रू, राक्षस आणि कृत्या म्हणजे चेटूक यांचा प्रतिबंध करण्यासाठी हे मंत्र आहेत. अभिचार आणि यातुविद्या या मंत्रांतून दिसते. या मंत्रांच्या भाषेतूनही निष्टुरपणा व्यक्त होतो. या मंत्रांना ‘अंगिरस्’ असे म्हटले जाते. या मंत्रांतील काहींचा संबंध इतर वर्गांतील विषयांशीही पोहोचतो. उदा., राक्षसांविरूद्ध असलेले मंत्र. भैषज्यसूक्तांतही राक्षसांविरूद्ध मंत्रयोजना आहेच.
‘यातुधान’ म्हणजे राक्षस, ‘किमीदिन्’ म्हणजे दुष्ट पिशाचांचा एक प्रकार यांच्याविरुद्ध अग्नी आणि इंद्र यांना आवाहन केले आहे . राक्षसांविरुद्ध शिशाचा उपयोग सांगितला आहे . येथेही ताइतांचा उपयोग सांगितला आहेच. उदा., अश्वत्थ आणि खदिर यांसारख्या वृक्षांच्या लाकडापासून तयार केलेले ताईत.
वज्र नावाच्या आयुधाचाही वापर दिसतो. दोन मंत्र थोडे दुर्बोध आहेत . शत्रूला मूत्रावरोधाची व्याधी व्हावी या दृष्टीने त्याच्या मूत्राशयावर परिणाम घडवून आणणारे हे मंत्र दिसतात. यांपैकी दुसरा मंत्र मात्र मुळात एक वैद्यकीय उपाय म्हणून असावा.
या विभागात येणारे वरूणसूक्त मात्र उत्कृष्ट काव्याचा नमुना आहे. त्यात वरुणाचे सर्वसाक्षित्व दाखविले आहे आणि असत्यवाद्यांना शासन कर अशी त्यास प्रार्थना केली आहे.
पवित्र कर्मांत अडथळे आणणाऱ्या शत्रूविरुद्ध केलेली मंत्ररचनाही आहे तसेच शत्रूच्या यज्ञात अर्पण केलेल्या आहुतीचा नाश करण्यासाठी मृत्यू आणि निऋती यांस आवाहन आहे.
चेटूक करणाऱ्यांचा प्रतिकार करण्यासाठीही मंत्र आहेत. उदा.,. ‘चेटक्यांचा नाश होवो. चेटक्याचे चेटूक त्याचे त्यालाच बाधो’ असे आवाहन या प्रकारच्या मंत्रांतून अनेक वेळा केलेले आढळते.
स्त्रीकर्मे
या वर्गातील मंत्र मुख्यतः स्त्रीजीवनाशी निगडित झालेले आहेत. स्त्रीचे विवाहपूर्व आणि विवाहोत्तर जीवन हा त्यांचा एक महत्वाचा विषय आहे.
कुमारिकेस वरप्राप्ती, नवदांपत्यासाठी आशीर्वचने, गर्भसंभव, गर्भवती स्त्रीचे व तिच्या गर्भाचे संरक्षण, पुत्रप्राप्ती, नवजात बालकाचे संरक्षण इत्यादींसाठी रचलेले मंत्र लक्षणीय आहेत.
अथर्ववेदाच्या १४ व्या कांडातील विवाहमंत्र याच वर्गातले होत. स्त्रीपुरूषांचे प्रणयमंत्र हाही या वर्गातील सूक्तांचा एक प्रधान भाग आहे. या मंत्रांस ‘वशीकरण मंत्र’ असेही म्हणतात. इच्छित स्त्री अथवा पुरूष लाभावा म्हणून पुरूषाने अथवा स्त्रीने वापरावयाचे हे मंत्र आहेत.
प्रेमात स्पर्धा करणाऱ्यांचा नाश करण्यासाठीही काही मंत्र दिले आहेत. या मंत्रांत दिसणारी असूया आणि चीड अत्यंत तीव्र आहे .
मत्सरग्रस्तांच्या हृदयातील मत्सर नाहीसा व्हावा म्हणूनही काही मंत्र आहेत .
स्त्रीचे कुलक्षण निवारणारे मंत्रही या वर्गात येतात.
पापनक्षत्रावर जन्मलेल्या मुलाच्या बाबतीत करायची शांतिक्रमे सुचविणारी मंत्ररचनाही येथे आढळते.
सांमनस्यकर्मे
कुटुंबात सलोखा नांदावा, व्यक्तिव्यक्तींमधील कलह नष्ट व्हावे, सामाजिक प्रतिष्ठा मिळावी, सभाजय साधता यावा इ. हेतूंसाठी ही सूक्ते आहेत
राजकर्मे
प्राचीन भारतात राजाला पुरोहिताची नेमणूक करणे आवश्यक असे. राजपुरोहितास राजाला हितकारक असे मंत्र ठाऊक असावे लागत.
या वर्गात येणारे मंत्र अशा प्रकारचे आहेत :राज्याभिषेक, राजाची निवड, हद्दपार केलेल्या राजाचे पुनःस्थापन, शत्रूंवर वर्चस्व संपादन करणे, राजाला युद्धात जय मिळवून देणे, शत्रुसेनासंमोहन, स्वीयसेनेचे उत्साहवर्धन, शत्रूच्या बाणांपासून करावयाचे संरक्षण असे अनेक विषय या मंत्रांतून येतात.
वेदकालीन राजनीतीची काही कल्पना त्यांतून येते
अथर्ववेद प्रतिष्ठित का नाही?
अथर्ववेदातील अभिचारमंत्रांच्या प्राधान्यामुळे त्या वेदास बराच काळ प्रतिष्ठा नव्हती. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांचा उल्लेख त्रयी अथवा त्रयी विद्या असा करून त्यांच्या नंतर अथर्ववेदाचा वेगळा उल्लेख केल्याची उदाहरणे आढळतात. कधीकधी तर त्याचा उल्लेखही टाळला गेल्याचे दिसते.
परंतु अथर्ववेदातील निरनिराळे विषय पाहिले, तर त्यांत मानवी संबंध आणि भावभावना यांचा वैविध्यपूर्ण प्रत्यय येतो. वैदिक काळातील आर्यांच्या सर्वसामान्य जीवनाचे प्रतिबिंब त्यांत दिसते. लोकसमजुती आणि लोकाचार यांचे दर्शन येथे होते. अथर्ववेदातून मिळणारी ही माहिती मानवशास्त्र आणि देवविषयक कल्पनांचा इतिहास यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाची आहे, असे अनेक विद्वानांचे मत आहे.
गोपथ ब्राह्मणातील उल्लेखानुसार सर्पवेद, पिशाचवेद, असुरवेद, इतिहासवेद आणि पुराणवेद हे अथर्ववेदाचे पाच उपवेद मानले जातात.