#माही_वे
हिंदी मध्ये एक छान म्हण आहे.
"सुई का काम जब तलवार से लोगे, तो हाथ का कटना लाजमी हो जाता है"
आजच्या विषयाला ही म्हण पूर्णपणे न्याय देईल अशी शाश्वती स्वतः मला सुद्धा नाही. कारण दुमत असं कि सुईचं काम तलवार करेलही परंतु तलवार ते स्वतःच्या पद्धतीने करेल, अर्थात जबाबदारी लक्षात घेउनच. तसे करीत असताना हाथाला ईजा झाली तर दोष कुणाचा हा प्रश्न विचारणे किंवा तलवारीची प्रतिष्ठा आणि तिचे योग्य काम लक्षात न घेता तलवारीला दोष लावणे निव्वळ मुर्खपणाचं आहे. स्वतःची नसलेली अक्कल पाझरणे असे शुद्ध भाषेत म्हणता येईल. विषयाचा वरील म्हणी सोबत संदर्भ त्या लोकांना मुळीच लागणार नाही ज्या लोकांसाठी क्रिकेट हा खेळ म्हणजे निव्वळ फळीने चेंडू टोलवून सीमारेषेच्या पलीकडे पोहचवण्यापर्यंत सिमीत आहे. अशा महाभागांनी गल्ली बोळात स्वतःच्या कुवतीप्रमाणे सीमारेषा ठरवून उंच उंच षटकार मारत आनंद साजरा करावा. क्रिकेटचे विश्लेषण करणे कोण्या शेंबड्या पोराचे काम नव्हें.
२ एप्रिल २०११ ची संध्याकाळ, वानखेडेचं मैदान, नजर जाईल तिकडे निळाच निळाप्रेक्षकांचा समुद्र, एक उत्तुंग षटकार आणि रवी शास्त्रींचे ते शब्द "Magnificent strike into the crowd. India lift the world cup after 28 years. Party start in the dressing room and its a Indian skipper whose been absolutely magnificent" ११ योद्धे त्या दिवशी जिंकले होते, लढले होते आणि मग रडले होते. परंतु जवळपास सर्वच भारतीयांना एका व्यक्तीवर विश्वास होता. आशा होती कि हा करून दाखवेल आणि आपल्याला आनंद साजरा करायची संधी देईल. त्या व्यक्तीने देखील करोडोंच्या आशा अपेक्षा आणि विश्वासाला सुरूंग लागू दिला नाही. करोडोंच्या तोंडी एकच नाव, एकच जयघोष "महेंद्रसिंग धोनी"
२००७ मध्ये पार पडलेल्या T20 विश्वचषकाचा अंतिम सामना आपण कसा विसरू शकतो. पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरूद्धचा सामना आणि अंतिम षटकाची धुरा एका नवख्या गोलंदाजाला देउन "तू अपना डाल, हार गए तो जिम्मेदारी मेरी" असं म्हणत प्रोत्साहन वाढवून दबाव स्वतःवर घेणारा तोच होता. पुन्हा एकदा तोच आनंद, तेच नाव, तोच जयघोष "महेंद्रसिंग धोनी". कोणताही संघ एका व्यक्तीने बनत नाही, लढत नाही आणि जिंकत सुद्धा नाही असं काहींचं म्हणनं आहे, मी ते मान्य केलं. परंतु अर्जुनाच्या रथाचा सारथी कृष्ण नसता तर त्याचा पराभव अटळ होता हे त्यांनी सुद्धा मान्य करावं.
त्या विश्वचषकानंतर आजतागायत संपूर्ण जगाने धोनीचा प्रवास पाहिला. एखादी दंतकथा वाटावी इतका तो सुंदर होता. अनेकांनी त्याला क्रिकेटच्या देवाचा दर्जा दिला, कित्येकांच्या गळ्याचा तो ताईत बनला, त्याच्या कर्णधारपदाच्या कौशल्याचे गोडवे जगभर लोकांनी गायले. अर्थातच ज्यांना क्रिकेट खरोखर समजतं हे सर्व त्यांनी केलं. गल्ली बोळात चौकार षटकार मारून क्रिकेट किती सोप्पा खेळ आहे असं समजणार्यांना धोनी कधी समजलाच नाही.
असं म्हणतात, भूतकाळातील पराक्रमांचे दाखले देउन वर्तमानाची लढाई जिंकता येत नाही. अगदी बरोबर, मी सुद्धा हे जसं आहे तसंच घेतलं. परंतु वरती सांगितल्याप्रमाणे जसा एक संघ एका खेळाडूमुळे जिंकत नाही तसा तो संघ कोण्या एका खेळाडूमुळे हरत सुद्धा नाही. माझा सरळ इशारा आत्ताचपार पडलेल्या विश्वचषकाकडे आहे. उपांत्य सामन्यात अगदी अटीतटीची लढत चालू असताना भारताने जगातील सर्वोत्तम फिनिशर गमावला आणि भारताचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं. सामन्यात भारताची फलंदाजी जवळपास संपूर्ण पाहता आली. केवीलवाणी अवस्था. ३ षटके, ३ बाद आणि अवघ्या ५ धावा. असंंच काहीसं चित्र होतं नाही का ? भारताचे आघाडीचे ३ फलंदाज झटपट बाद झाले होते तसेच भारताची मधली फळी ढेपाळते हे या विश्वचषकात जगजाहीर झालं होतं. मनोमन एक आशेचा किरण जागू लागला जेव्हां हार्दिक आणि पंतने भागीदारीच्या ५० धावांकडे वाटचाल केली परंतु पहिले पाढे पंच्चावन्न. पुन्हा दोन फलंदाज बाद, पुन्हा एक. मधल्या फळीने पुन्हा एकदा कच खाल्ली होती. आता मैदानावर पाउल ठेवले होते जगातील सर्वोत्तम फिनिशरने.
कर्णधारपदाचा भार हलका झाल्यानंतर सर्वत्र या महान खेळाडूवर टीकेची झोड उठवली जात होती. कारण एकच "संथ गतीने फलंदाजी करण्याचा पवित्रा". जगातील सर्वोत्तम फिनिशर हा मानाचा तुरा स्वयंघोषित मुळीच नाही तो मान जागतिक क्रिकेटनेच त्याला दिला आहे. प्रत्यक्षदर्शी पाहता मात्र चित्र वेगळं होतं. जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त सामना खेचून घेऊन जाण्याची जबाबदारी या फिनिशरच्या खांद्यांवर होती. ही पहिली वेळ मुळीच नव्हती जेव्हां अशी जबाबदारी या फिनिशरला झेलावी लागली होती, अनेक वेळा त्याने अशी जबाबदारी लीलया पेलली आहे. यावेळी देखील त्याने त्याचं काम अर्थातच केलं होतं. समोर एक फलंदाज असता तर नक्कीच त्या क्षणाला दुसरी धाव घेण्याचा निर्णय घेतला गेला नसता आणि सामन्याचं चित्र वेगळं पहायला मिळालं असतं. निर्णायक क्षणी भुवनेश्वरला एवढं दबावात आणने कधीही शक्षाणपणाचं नव्हतं. सोबतच मनात आणेल तेव्हां चेंडू मैदानाबाहेर पोहचवेल अशी ख्याती आणि ताकद नक्कीच त्या फिनिशरकडे #अजूनसुद्धा आहे. ईथे अजूनसुद्धा या शब्दावर विशेष जोर.
धोनी हा आता एक व्यक्ती किंवा खेळाडू राहिला नसून तो ब्रांड झाला आहे. पदार्पणाच्या काळात हा खेळाडू मैदानावर आला कि विरोधी संघाच्या गोलंदाजांना घाम फुटायचा, तो आताही फुटतो यात काही दुमत नाही. मैदानात आल्याबरोबर चौफेर षटकार चौकारांचा वर्षाव करणे अशी धोनीची ओळख झाली होती. आता तसं चित्र फक्त सामन्याच्या शेवटच्या काही षटकांमध्येच पहायला मिळते, परिणामी मागील काही वर्षात नेटकर्यांनी टीकेची झोड उठवली आहे. काळानुरूप त्याच्या फलंदाजीत झालेला किंबहुना जाणून केलेला बदल आणि त्यामागील कारणांचा अभ्यास नेटकर्यांनी बहुदा केला नसावा. पदार्पणात ज्या क्रमांकावर धोनी फलंदाजीला यायचा त्यावेळी त्याच्याकडे जेम्स बाॅन्ड प्रमाणे लायसंस टू किल असायचं जसे आता हिर्दिक आणि पंतला दिले जाते. सद्य परिस्थिती मध्ये त्याच्या फलंदाजीचा क्रमांक हा अगदी शेवट येतो जिथून पुढे एकही फलंदाज असा राहत नाही जो धोनी बाद झाल्यावर सामना सावरेल. परिणामी सामना कोणत्याही टप्प्यात असला तरी हा पठ्ठ्या खिंड लढवतोच आणि संघाला विजयश्री मिळवून देतो. अर्थात एवढ्या वर्षात अनुभव, जबाबदारी आणि खेळाची वाढलेली समज संपूर्ण पणाला लावूनच त्याला खेळ करावा लागतो ( फक्त शिवीगाळ करून सामना जिंकता येत नसतो). परिणामी फलंदाजी संथ होते नव्हें ती करावीच लागते. एकंदरीत काय तर जगातील सर्वोत्तम फिनिशर धोनी नावाच्या #तलवारीला राहुल द्रविड नावाची #सुई ज्याची ख्याती एखाद्या भिंतीप्रमाणे विरोधी गोलंदाजांच्या मार्यापुढे उभे राहून फलंदाजीची झालेली पडझड थांबवण्याची भूमिका पार पाडावी लागत आहे. मग अशा वेळी तलवारीने हाथ कापला तर दोष तलवारीला कसा बरं लावता येईल ?
ज्या उपांत्य सामन्यात भारताचा पराभव झाला त्या सामन्यात जडेजाने फार मोठी भूमिका बजावली. चौकार षटकारांनी सुशोभित खेळी केली. विश्लेषकांच्या मते गेली काही वर्षे "धोनी हा भारताच्या मधल्या फळीतील रणमशीन नव्हे तर विकेटच्या प्रवाहात उभा राहणारा खडक असल्याची भूमिका निभावत आहे". त्या खडकाचा आधार घेऊन इतरांनी धावा काढत रहायचं. जडेजाने नेमकं तेच केलं त्या दिवशी. धोनीच्या जागी इतर कोणीही असतं तर जडेजाला ती खेळी सजवता आली असती यावर मी सहमत नाही. काही समंजस क्रिकेटप्रेमींना वगळता इतरांनी मात्र जडेजाचे चौकार षटकार आणि धोनीची संथ फलंदाजीच पाहिली. दोन षटकांच्या मध्ये नक्की काय संभाषण झाले असावे ? काय रणनिती आखली गेली असावी ? विजयश्रीची वाटचाल कशी करावी ? नक्की कोणत्या षटकात कोणत्या गोलंदाजावर प्रहार करायचा ? या सर्वांचा विचार अथवा अभ्यास त्या इतरांना बहुदा करावासा वाटला नसेल, कदाचित तेवढी पतच नसेल. सामन्यानंतर सोशल मिडियावरील प्रतिक्रियांमधून तर हेच चित्र दिसत होतं.
कोणत्याही विषयावर प्रकाश टाकायचा म्हणलं कि त्याचा अभ्यास असणं अत्यंत महत्वाचं होऊन जातं अन्यथा प्रत्येक शब्द हा वाचा बरळ बरळ ठरतो. या विश्वचषकाचा मी देखील अभ्यास केला, अर्थातच त्यासाठी मी क्रिकेट विशेषज्ञ आणि विश्लेषकांच्या मतांचा आधार घेतला आणि काय आश्चर्य. मी भावनिक परंतु वैचारिक दृष्टिकोण जपून केलेल्या अभ्यासाची विशेषज्ञांच्या मतासोबत साम्यता दिसली. विश्वचषकात धोनीच्या फलंदाजीच्या पवित्र्यावर सर्वात जास्त प्रश्नचिन्ह उभे झाले ते इंग्लंड विरूद्धच्या सामन्यानंतर. शेवटच्या पाच षटकांत जिंकण्याचा प्रयत्नच केला गेला नाही असा थेट आरोपच जावला गेला. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात भारताची संपूर्ण फलंदाजी पाहिली. जवळपास ४० षटके झाली होती तेव्हां धोनी मैदानात आल्याचं आठवतं. इंग्लंडने गोलंदाजीचा सुंदर नमुना सादर करत भारतीय फलंदाजीतील धारच जणू काही काढून घेतली होती. १० षटकांत १०० पेक्षाही जास्त धावांची गरज असताना धोनी मैदानात आला, अर्थात यावेळीही परिस्थिती काही वेगळी नव्हती, मागे कोणीही फलंदाज शिल्लक नव्हते. १० षटकांत १०० पेक्षाही जास्त धावा काढण्यासाठी सततची फटकेबाजी करणे गरजेचे होते परंतु ते जास्त धोक्याचे होते. भारताने धोनीची विकेट लवकर गमावली असती तर नक्कीच सामना लवकर संपला असता आणि भारताचा पराभव जास्त जिव्हारी लागला असता. तो पराभव होणार हे निश्चितच होते परंतु किती फरकाने होणार यावर गुणतालिकेची सरासरी ठरणार होती. परिणामी संथ फलंदाजी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचून धावांचा फरक कमी करणे हाच एक मार्ग धोनी - जाधव जोडीकडे शिल्लक होता, तेव्हां जिंकण्याचा प्रयत्नच केला नाही हा आरोप बिनबुडाचा ठरतो. गुणांची संख्या बाजूला सारून सरासरीचा विचार केला तर भारताने गुणतालिकेत गाठलेल्या सर्वोच्च स्थानाचं संपूर्ण श्रेय मी इंग्लंड विरूद्ध धोनी - जाधव जोडीने केलेल्या समंजस खेळीला देईन
मी धोनीचा चाहता म्हणून आज त्याचा पक्ष मांडण्यासाठी लिहितो आहे असे मुळीच नाही. खरंंतर मुद्दा हा निर्णायक सामन्यांचा सुद्धा आहे. नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकातील पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागला, परंतु ही काही पहिली वेळ नव्हती जेव्हां भारताला निर्णायक सान्यात पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. २००३ विश्वचषकातील अंतिम सामन्यानंतर २०११ विश्वचषकातील अंतिम सामना वगळता बहुदा सर्वच निर्णायक सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजी ढेपाळताना दिसली आहे. मग तो २०१५ विश्वचषकातील उपांत्य सामना असो, २०१७ चैम्पियन्स चषकातील अंतिम सामना किंवा मग आत्ताच्या २०१९ विश्वचषकातील उपांत्य सामना. निर्णायक सामन्यात धावांचा पाऊस पाडेल असा एकही फलंदाज भारताच्या फळीत दिसत नाही अथवा मोक्याच्या क्षणी फलंदाज कच खाऊ लागलेत. आपल्याकडे आकड्यांमध्ये सांगितलेली गोष्ट जास्त छान समजते म्हणून जेव्हां भारताचे ३ फलंदाज ज्यांची सर्रास चर्चा होत असते त्यांच्या निर्णायक सामन्यांमधील आकडेवारीचा (२०१९ विश्वचषकाच्या आधीचे) अभ्यास केला तेव्हां या गोष्टीला दुजोरा मिळाला कि निर्णायक सामन्यात धावांचा डोंगर रचण्यात भारतीय फलंदाज अपयशी होतात. निर्णायक सामन्यांमध्ये विजयश्री मिळवून देईल असा एकही फलंदाज सद्यस्थितीत भारताकडे नाही.
भारताच्या त्या ३ फलंदाजांच्या यादीत सर्वात आधी नाव सचिन तेंडूलकरचे घेतले जाते पाठोपाठ विराट कोहली आणि त्यानंतर सध्या भारताच्या मधल्या फळीतील सर्वात मोठा आधार असलेल्या धोनीचे नाव येते. भारताची "रणमशीन" म्हणून ओळख असणार्या विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या १४ निर्णायक सामन्यांमध्ये (अर्थातच बलाढ्य संघांविरूद्ध) निव्वळ २९.१६ च्या सरासरीनेच धावा काढल्या. त्यात नाममात्र २ अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे भारताचा आणि जगातील सर्वोत्तम फिनिशर धोनीने ११ निर्णायक सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यातील ९ सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळता २८.२५ च्या तोकड्या सरासरीने २२६ धावा जमवल्या (यात २०११ विश्वचषकातील अंतिम सामन्याचा समावेश नाही) भारताचा तिसरा फलंदाज आणि माजी खेळाडू सचिन तेंडूलकरच्या निर्णायक सामन्यातील आकडेवारीचा विचार करता सचिन वरचढ असल्याचे दिसून आले. ५२ निर्णायक सामन्यांच्या ५१ डावांमध्ये सचिनने तब्बल ५२.८४ च्या सरासरीने २४३१ धावा रचल्या. यात ७ शतके आणि १४ अर्धशतकांचा देखील समावेश आहे. आकडेवारी हे देखील सांगते कि सचिनच्या निर्णायक सामन्यातील प्रत्येक शतकाने भारताला विजयश्री मिळवून दिली.
वरील आकडेवारीचा विचार करता असे लक्षात येते कि जर भारताला निर्णायक सामन्यांमध्ये विजयाची चव चाखायची असेल तर विराट कोहलीला आघाडीच्या ३ फलंदाजांच्या साथीने ते करण्याची गरज आहे जे सचिन करत होता. धोनीच्या फलंदाजीचा क्रमांक पाहता त्याच्याकडून शतकांची अपेक्षा करणे पुर्णपणे योग्य ठरणार नाही. २०१९ च्या विश्वचषकात भारताला सर्वात जास्त नुकसान शिखर धवनच्या दुखापतीचे झाले. ICC च्या सर्वच मोठ्या स्पर्धांमध्ये शिखरची बॅट आग ओकते हे त्याने प्रत्येक मोठ्या स्पर्धेत दाखवून दिले आहे. शिखर या विश्वचषकात भारताचा सचिन नक्कीच होऊ शकला असता. असो, विश्वचषक पार पडला. जगाला एक नवा जगज्जेता संघ मिळाला. इंग्लंड संघाला अनेक शुभेच्छा. आता पुढील चार वर्षात भारतीय संघाला आणि संघ व्यवस्थापनाला गरज आहे ती या डोकं वर काढू पाहणार्या प्रश्नावर तोडगा काढायची.
"कोण होणार २०२३ विश्वचषकात भारताचा सचिन ?"
----- राज पुणेकर