मार्च पासून घरीच काम करून जीव मेटाकुटीस आला..
आणि आधी आठवण आली ती आमच्या संगीता ताई ची..
कशी चटचट काम उरकायची ना ...गप्पांचा फड आणि आल्याचा चहा...


खरंच खुप आठवण येतेय बाई तुझी !!
मग काय घेतला फोन आणि लावला नंबर..
काय ग संगीता....कशी आहेस? - मी
ताई आमच्या बिल्डिंग मधल्या सीमा ला कारोना झालंय हो..
आता आम्हाला पण ते कुठं घेऊन जाताय..(qurantine)
तिचा चिंतेचा सुर ऐकुन माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली...बर आजार असा की जाऊन भेटता पण येत नाही.. माझं मन बेचैन !!
त्यात ती एकटीच राहते..मुलींचे लग्न झालेले त्या त्यांच्या गावी..
कसे तरी दोन धीराचे शब्द बोलुन मी फोन ठेवला ..
पण मनात विचार सुरूच होते..
साधारण वीसेक दिवसांनी मी पुन्हा फोन केला तिला तोही घाबरतच..आता काय कानावर येईल ?! असं मनाशी बोलत लावला फोन..
काय ग! कशी आहेस?
आवाजातील भीती लपवत मी विचारलं..
मी मस्तये ताई...
क्षणभर मला तिच्या आवाजात खुप आनंद जाणवला...पण मग वाटलं मला काही तरी भास होतोय..
तुला qurantine केलं होत ना ग! - मी
हो ताई ..लैच मज्जा आली तिथं - ती
माझा माझ्या कानावर विश्वास च बसेना..
Corona आणि मज्जा? ! 
म्हणजे ग?
खुर्चीचा आधार घेतच मी विचारलं ..
अहो ताई ss - ती
आता अजून हि काय ऐकवते काय माहित?! ..म्हणून मी पटकन बसून घेतलं
ताई आम्हाला नेलं होत ना तिथं..ते काय qurantine का काय ते सेंटर वर..तिथं लै मज्जा आली..- अजूनच खुशीत येऊन ती सांगत होती..
आणि मी डोळे कान मोठे करून ऐकत होते..
तर तिथं किनाई मला आणि आमच्या सविताला ( मैत्रीण) एक रूम दिली..मोठी रूम आणि आम्ही दोघीच..आणि मस्त कॉट होत बरं का !
दोन कोपऱ्यात दोंघिंचे कॉट..
इथ मी तुमच्या सारख्या कडे कामाला जाती...आणि तिथं आमच्या दोघींचे बाथरूम घासायला पण माणूस यायचं दररोज..
अहो ताई काय सांगु तुम्हाला अजून मज्जा..सकाळी असा गरमागरम नाष्टा..कधी इडली, कधी आप्पे,कधी पोहे,कधी उपमा, लयीच भारी..
थोड व्यायाम करायचा.. उन्हात फिरायच..पुन्हा रूम मध्ये यायचं..मी फकास्त माझी साडीच धुत होती...बाकीची साफसफाई पण ते बुरखे वाले लोक ( PPE kit घालून ) करायचे..
दुपारी जेवणात पण गोड द्यायचे..काय मस्त होत जेवण ताई..
ती सवी मोबाईल वर गाणे लावायची मग काय नाच काय गाणं काय..मज्जा करायची आमी..
ताई खर सांगु का ? आता जावई आले मला पण कधी माहेरपण माहीत नाही..आई बाप नाही ..भाऊ हाय..पण तिथं जाऊन काय मी नुस्त खाणार का?
ह्या कोरोनान माझं माहेरपण केलं बघा..
ताई तुम्ही पण यायला पाहिजे होत... लै च मज्जा असती बघा..
दरवर्षी यावा ओ हा corona !!
अतिशय उल्हास ने बोलली ती..
आणि मी मात्र डोक्यावर हात मारून घेतला



तिचा आनंद तिच्या बोलण्यातून मला जाणवायला लागला.. न पाहताही ती किती आनंदी असेल ह्याची कल्पना येत होती..
आता पर्यंत कोरोनाच्या वाईट गोष्टी खुप ऐकल्या ना..
पण एका मोलकरीण ला माहेरपण दिलेला corona पहिल्यांदाच पाहिला !


