आज असती तर ७५ वर्षांची झाली असती. आम्ही सगळ्यांनी आणि तिनंसुद्धा हौसेनं पंचाहत्तरी नक्कीचं केली असती. तिने काय काय घेतलं आणि केलं असतं. एखादा लेटेस्ट स्मार्ट फोन असता घेतला किंवा असंच काही. किती हौस तिला. उत्साह अमाप. मैत्रिणी बऱ्याच. हुरूप भरपूर. शांत, साधा स्वभाव. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं. हसतमुख कायम. काय असते ना, आई? लिहिणारे बरंच जातात लिहून. पण प्रत्येकाची वेगळी व्याख्या. कारण माणूस बदलला की अनुभव बदलतो आणि दृष्टिकोन सुद्धा.
मी आई सारखी दिसतं नाही असं बरेच जण म्हणतात. धाकटी बहीण दिसते बरीच असं सुद्धा बरेच जण म्हणतात. लोकं असं किती सहजपणे बोलून जातात. त्यात चूक बरोबर किंवा योग्य, अयोग्य सुद्धा काही नाही. पण त्यांची पाठ वळताच मी कधी कधी आरशासमोर उभी रहाते. बघते त्यात वाकून, अजून खोलवर काहीतरी सापडतंय का साम्य. चेहऱ्यात. केसांचे वळण. किंवा कपाळावरची आठी. किंवा हात पाय माझे. चालायची ढब. कधी कधी काही सापडतं. कधी कधी काहीही सापडत नाही. त्याचं सुद्धा काही नाही. एकातून दुसरी आलेली असली तरी ती तशी कशी असेल? ती वेगळीच असणार. तिचं नशीब, तिचे गुण अवगुण, तिचा स्वभाव. ती वाढली तो काळ, तिचं घर, तो भवताल सगळं जर असेल वेगळं तर त्यातून घडणारा माणूस, सारखा कसा असेल. हे सगळं बुद्धीच्या पातळीवर पटतच आपल्याला. पण तरीही आपल्याला तिच्यासारखं दिसायचं असतं. तिच्यातलं आपल्यात आलंय का काही आणि काय ह्याची चाचपणी करत असतोच आपण. नकळत आपल्याच. तिचं असते आई.
आता जसं ती नसतांना समोर उभं राहून आरशाच्या मी बघते निरखून स्वतःला तसं कितीदा मी केलं आहे. लहान असताना. फक्त तेव्हा तिला असे बघत. ती साडी नेसताना. केस बांधताना. पावडर लावतांना. तिचं भांग पाडणं. साडी झाली नेसून की हळूच एका पायाने मागून तिला खाली खेचणं. नेहमी जास्त पावडर लावणं. अग नंतर उडतेच ती म्हणून लावणं. मी सुद्धा अशीच भरपूर लावते पावडर. नंतर उडणारचं आहे म्हणून. हे असं येतंच आपसूक. मला काही तिच्या सारखी संसाराची तितकी आवड नाही, असं मी पण धरून सगळ्यांना वाटतं. पण परवा गेले होते एका बहिणीकडे तर इतकं सहज तिच्या नवीन भांड्याने लक्ष वेधलं माझं. नकळतपणे ते भांडं मी निरखलं. खाली वर तपासलं. आणि दोन दिवसात अगदी तसंच्या तसं घेतलं सुद्धा. हे कुठून आलं सगळं मग माझ्यात. तिच्या माझ्यात असणाऱ्या रक्तपेशींमधून. का तिच्याबरोबर, सोबत वाढतांना ते गेलं येत?
स्वभाव अगदी सारखे नाहीत तुमचे असं सुद्धा म्हणायचे सगळे. पण जगतांना आता वाटतं की काही गोष्टी इतक्या समान आहेत आपल्यात की ती का मी कळतंच नाही माझं मला सुद्धा. माझ्या वयाच्या ह्या टप्प्यावर ती कशी होती? हे आता आठवतं नाही फारसं. इतकं गतिमान जीवन गेलंय आमचं. कधी खंतावतं मन पण पुढल्या क्षणाला बरं सुद्धा वाटतं. त्यामुळेच तर मोकळं आणि सहज जगू शकते की मी. चुका करत. स्वतःला सावरत आणि शोधत स्वतःला. हे असं बाईपणाचं पण किती समान आहे काही आमच्यात. मला आता नको वाटतात वाद. लगेच मीच सॉरी म्हणून टाकते. माझं मलाच वाटतं मग नवल. कुठं गेली ती हिरीहिरीनं वाद घालणारी कोणी? मतं असणारी आणि ती मांडणारी कोणी? पुसून का गेली? पण नाही ती मुलगी होती. तिला ती उसंत होती आणि मागे आई. पडलं तर कायम सावरायला. आता ती मुलगी नाही आणि पुढं तिची मुलगी आहे. त्यामुळे ना तिला ती उसंत आहे ना तो अवकाश. तिनं फक्त करायचं आणि सोडून द्यायचं. आणि परत सगळं करून सॉरी म्हणायचं. तिचं असते आई.
आई, आई म्हणून कशी होती असंच सगळे शोधत असतात. सगळे नियम लावून, निकष लावून. ती चुकू शकतं नाही. चिडू शकते फारतर. का ती का माणूस नाही? आता कोणी विचारलं मला. कशी होती तुझी आई? तर मी काही म्हणतच नाही. पण माणूस म्हणून खूप मोठी होती माझी आई. अत्यंत कामसू, दक्ष बाई. तिला असं चार चौघात फाडफाड बोलता येतं नसे. पण सतत काम करत असतं ते हात. न थकता आणि कंटाळता परत. हा किती मोठा गुण. आज मी पण करते खूप काम तेव्हा कळतं की तेच तेच काम रोज रोज त्याच उत्साहानं करणं किती कठीण. कर्मकठीण. हुशार होती. म्हणून गप्प बसून बरंच काही करायची. आजकाल मी पण तेच करते. गप्प बसते. आणि एक एक काम हातावेगळं करते. बाई म्हणून जगतांना लागणारी हुशारी असं देऊनच जाते आई. बरेचदा निघून गेल्यावर. सतत देत राहते आणि प्रत्येक वळणांवर देते. कधी उभं राहून पाठीशी. कधी मागे लागून. कधी पत्रांमधून. कधी बोलून. न बोलून. कधी निघून जात आपल्या जगातून ती फक्त देत राहते. तिचं असते आई.
ती गेली तेव्हा रडले नाही मी जास्त. बऱ्याच जणांना बरंच काही वाटलं. पण केवळ रडून थोडंच व्यक्त होतं दुःख? जगतांना तिला सुद्धा असं कधी कोलमडून जाऊन रडतांना पाहिलं नाही. पण म्हणून दुःख आणि वेदना कमी नाही भोगल्या तिने. आता वाटतं, कुठं रडतं असेल ती? कोणाकडे होतं असेल व्यक्त? सांगत असेल कोणाला तिची सुख दुःख. तिचे सल. त्रास तिचा. मला हे माहित नाही. आणि माहीत नाही हेच किती बरंय. उद्या माझ्या मुलीला सुद्धा हेच पडतील प्रश्न आणि त्याची उत्तरं तिची तिलाच लागतील शोधावी. तिचं असते आई. जी अलगदपणे बोट सोडून आपलं सोडून देते आणि बघते मागून हजारांमधली एक होऊन तिचं असते नां आई. असं म्हणतात की आई वडील गेल्यावर आपण खऱ्या अर्थी मोठे होतो. आणि खरं सुद्धा आहेच ते. शेवटी मोठं होणं म्हणजे तरी नक्की काय असतं? आपलं आपल्याला उलगडतं बरंच काही. कळू लागतं थोडं फार. कधी जबाबदाऱ्या. कधी कर्तव्य. कधी जगण्याचं कारण आपल्या. आणि बाईसाठी सुद्धा ते केवळ तिची मुलंबाळं आणि तिचा संसार नाही. हे जी सांगते कधी बोलून स्वतः किंवा कधी अबोलपणे आपलं जीवितकार्य घट्ट धरून आपल्या हृदयाशी. शेवटी तिचं असते आई.
© प्राची बापट