साहित्य:
१/२ कप साखर, वरपर्यंत भरून
१/२ शेंगदाणे, सपाट कप
थोडे तूप
कृती:
१) शेंगदाणे भाजून घ्यावे. रंग खूप गडद करू नये. त्याचबरोबर शेंगदाणे कुरकुरीतसुद्धा राहिले पाहिजेत. शेंगदाणे गार झाले कि साले काढून पाखडून घ्यावे. तसेच शेंगदाणे विलग करून घ्यावे.
२) पोळपाटाला (शक्यतो मेटल किंवा दगडाचा) तुपाचा हात लावून घ्यावा. तसेच जाड सपाट बुडाच्या भांड्याला किंवा वाटीला बाहेरून तूप लावा.
३) नॉनस्टीक पॅनमध्ये साखर पसरवून घालावी. पाणी घालायचे नाही, नुसतीच साखर घ्यायची. गॅस सुरू करून आच एकदम मंद ठेवावी. आच मंद असणे गरजेचे आहे नाहीतर साखर करपेल.
४) साखर हळूहळू वितळायला लागेल. मग चमच्याने हळूहळू ढवळा. शक्यतो साखर खूप पसरू देऊ नकात नाहीतर ती वाया जाते.
५) साखर पूर्ण वितळली कि गॅस बंद करावा. लगेच त्यात भाजून सोललेले शेंगदाणे घालावेत. लगेच मिश्रण पोळपाटावर घालावे. वाटीने थापावे. किंवा लाटण्याला तूप लावून लाटावे. ही क्रिया भरभर करावी नाहीतर पाक लगेच कडक होईल. गरम असतानाच सुरीने किंवा कालथ्याने तुकडे करण्यासाठी मार्क करून ठेवावे.
चिक्की लगेचच गार होते. तुकडे करावे.
टिपा:
१) अशाप्रकारे काजू वापरूनही चिक्की बनवता येते. काजू थोडे रोस्ट करून घ्यावे.
२) चिक्की थापायला अलुमिनम फॉइल वापरू नये. तसेच प्लास्टिकही वापरू नये.
३) वरील प्रमाण दुप्पट किंवा तिप्पट करून जास्त चिक्की बनवाव्यात.