रेशमाच्या एका जाळीने एक सौंदर्यवान युवतीने आपला चेहरा झाकावा त्या पद्धतीने पावसाच्या सरींनी डोंगरी गावाला झाकले होते. सुरेशची गाडी जास्त वेगाने जरी जात नसली तरी त्याच्या गाडीचे वयपर्स जोराने फिरून गाडीच्या आरश्यावरील पाणी बाजूला फेकत होते. पावसाच्या सरींचा आवाज आणि त्या वयपर्स चा आवाज ह्यांच्या मिश्रणाने एक वेगळेच संगीत निर्माण झाले होते आणि त्याच्या तंद्रीत सुरेशला आपण कधी गावी येऊन पोचलो हेच समजले नाही.
सकाळचे १० तरी वाजले असतील पण आभाळांत ढगांनी झिम्मा घातला होता त्यामुळे सूर्यदेव नक्की कुठे आहे हे सुरेशला सांगणे अवघड जात होते. गांवातील बाजार मध्ये सुरेश चहा साठी थांबला. गाडी त्याने शंकराच्या मंदिराच्या बाजूला पार्क केली आणि छत्री घेऊन पळत पळत तो दुकानाकडे आला. डोंगरी गांवचा बाजार म्हणजे मोजून सहा दुकाने. महादू शिंपी, गोरा न्हावी जो प्रत्यक्षांत काळा होता, साखरंचि चहा आणि हलव्याची टपरी, बाजूला रामभाऊ आपले भूसारीचे दुकान चालवीत. बाकीची दोन दुकाने नक्की काय विकत होती हा सुरेशला सुद्धा प्रश्न होता.
"पाव्हणं नवीन दिसतंय गावांत" सखाराम ने प्रश्न न करता सुरेशच्या हातात चहा चा ग्लास दिला. सुरेशने मान हलवून तो ओठाला लावला. पावसाच्या धारांनी चाहोबाजूला पाणी वाहत होते. जणू काही छोट्या छोट्या नदिनी रस्त्यावर आक्रमण केले होते. बाहेर पाऊस पडताना गरम गरम चहा पिणे हा एक वेगळाच आनंद सुरेशला नेहमी पासून वाटत आला होता पण पाऊस आणि सुरेश ह्यांचे अजिबात पटत नव्हते. पाऊस ह्या प्रकारचा त्याला इतका तिटकारा होता कि तो आनंदाने पुण्यात स्थायिक झाला होता.
सखारामच्या टपरीवर गजानन मास्तर चहा पीत बसले होते. "तुमच्या तिकडे असा पाऊस पडत नाहीत वाटत पाव्हणं" त्यांनी सुरेशला विचारले. "एके काली पडत असे, आता नाही पडत " त्याने उत्तर दिले.
"हो हल्ली पर्यावरणावर मानवाने इतका हल्ला चढवला आहे कि सगळंच हवामान बदलत आहे राव" सखारामने गरम गरम शिरा आणून ठेवत म्हटले.
"सगळ्याच गोष्टी बदलत आहेत. माणूस सुद्धा. " सुरेशने खिशांतून १०० ची न सखाराम ला देत म्हटले.
"खरे आहे, पण आमच्या गावांत नाही बर का लोक बदलत. आमचा गाव मात्र तसाच सुन्दर आहे. लोक सुद्धा साधी भोळी, आपली थोडक्यांत सुख मानून राहणारी. एक मेकांना मदत करणारी. आमचा डोंगरी गांव आहेच एक्दम सुबक. "
"हो पाऊस पडतोय म्हणून कदाचित मी पूर्णपणे पाही नाही शकलो" सुरेशने भावनांवर ताबा ठेवत म्हटले.
"तुम्हाला नाही का पावस आवडत ?" गजानन मास्तरांनी म्हटले. पुढे तेच बोलू लागले "पाऊस म्हणजे नवीन जीवन. हवामानाच्या त्या किचकट प्रक्रियेतून ते पाणी लक्षांत जाते काय आणि पुन्हा खाली येते काय पण त्यातूनच आमचे पीक उभे राहते. शेतकरी पावसाची अशी वाट पाहतो जशी त्या लैलेने मजनूची वाट पहिली नसेल." असे म्हणून तेच खो खो हसले. सखारामच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित आले.
"पण त्या मजनूची झाली तशीच अवस्था आमच्या बिचार्या शेतकऱ्याची होती हो, कारण परवाच वाचनात आले कि शेतकऱ्याची जमीन सरकार हिसकावून घेतेय म्हणून" सुरेशने मास्तरांना विचारले.
"वाह , आमच्या गावाचे नाव पेपरात आले काय ? " मास्तरांनी आनंदात विचारले. "हो त्या कसल्या तरी प्लांट साठी आमच्या गावांतील शेतजमीन एक मोठी कंपनी विकत घ्यायला पहाटे पण आम्ही नाही देणार. असले प्लांट बाळंत नको आम्हाला आमच्या गावांत. आमच्या शेतीमालाला सरकारने भाव द्यावा आणि आम्ही जगू"
"तुमची शेती आहे का हो ? " सुरेशने त्यांना विचारले.
"नाही बुवा, आमची कुठे शेती ? आम्ही शाळेंत मास्तर आहोत. आम्हाला सरकार पगार देते." मास्तरांनी सांगितले.
चहाचा काप ठेवून सुरेश उठला आणि त्यांनी सखाराम आणि मास्तरांना राम राम केला. गाडीत जाऊन त्याने गाडी सुरु केली आणि त्या वायपरच्या आवाजांत तो पुन्हा गाडी घेऊन गावतील त्या एका रस्त्याने आंत गेला.
एक प्रशस्त घरापुढे त्याची गाडी थांबली. गांवातील इतर सर्व गरीब घरापुढे हे घर मात्र मोठे श्रीमंत वाटत होते. सुरेशला पाहताच दार उघडणाऱ्या मुलाने घरांत धूम ठोकली. थोड्या वेळाने भले मोठे पोट सांभाळीत धोतर घातलेली एक मोठी व्यक्ती हजर झाली.
"या या सुरेशराव, तुमचीच वाट पाहत होतो" त्यांनी सुरेशला आलिंगन दिले. पावसाची धार बाहेर थोडी कमी झाली होती. दर उघडलेला मुलगा आता बाहेर एका डबक्यांत कागदी होडी सोडत होता.
"अग, हा सुरेश. ते गोपाळभट नव्हते का ? जे कधी कधी श्राद्धाला वगैरे इथे यायचे ? त्यांचा मुलगा हा लहान असतानाच पुण्याला गेला होता शिकायला" तात्यारावांनी आपल्या बायकोला सुरेशची ओळख करून दिली.
सुरेश खुर्चीत बसला.
"हा पाऊस अगदीच अवदसा आहे बघ. नक्की आजच पडला हरामखोर" तात्यारावांनी पावसाळा शिवी हासडली. सुरेशला मानतो थोडे बरे वाटले.
"तर सुरेश, तू चांगला शिकलेला माणूस. गोपाळभटानी तुला पुण्यात पाठवले ते अगदी बरे केले बघ. इकडे गावांत काय आहे ? तुझ्या बरोबरचे सर्व मुलगे शिकायला म्हणून बाहेर पडले आणि कुणी पुन्हा परत नाही आला. का येणार ? इथे ना धड शाळा आहे ना हॉस्पिटल. इथे राहिलेत ते फक्त उनाड टोणगे. ह्यांना शेतांत काम करायला नको पण बुलेट घेऊन फिरायला पाहिजे. मग आमच्यासारखी माणसे ह्यांचा फायदा घेणार नाहीत तर काय ? " असे म्हणून चेहऱ्यावर एक प्रकारची निर्ल्लजता दाखवत तात्याराव हसले.
"मी सचिनला शिकायला थेट ऑस्ट्रेलियात पाठवले. मग आता तो म्हणतो तिथे घर घ्यायला किती मिलियन कि फिलियन पाहिजे. मग काय कर करणार ? इथे उसाच्या शेतीतून धड पन्नास हजार काढायला दमछाक होते. काही फोन केले तर म्हणे मुख्यमंत्र्यांचे जावई बियर फॅक्टरी घालू इच्छित आहेत. मीच आधी आमच्या गावाचे नाव घेतले आणि नंतर इथल्या टोणग्यांना हातात धरून विरोध सुद्धा केला. जमिनीचा भाव आहे १८० रुपये. मी आवई उठवली कि सरकार ५ रुपयांत जमीन हिसकावून घेत आहे. लोक जाम घाबरलेत. मुख्यमंत्र्यांशी मी आधीच बोलून ठेवलेय. शेवटी भाव मिळेल ८०० रुपये पण त्याआधी २० एकर जमीन त्यांच्या मुलीच्या नावाने पाहिजे. आता मी हींत तिथं हात मारून अनेक लोकांची जमीन २०० रुपये कुठे १५० रुपये देऊन मिळवली पण फक्त ३० एकर जमीन मिळालीय. ह्यातील २० एकर घेणार मुख्यमंत्र्यांची पोरगी आणि लोकल आमदार. बाकी दहा मला. आणखीन २० एकर जमीन फॅक्टरी साठी पाहिजे. एकदा हि २० एकर मिळाली कि सरकारदरबारी हमीभाव मी ८०० रुपयांनी मिळवीन आणि रातोरात पैसे करून मोकळा होईन. गोपाळ भटांची १० एकर जमीन आहे हे मला समजले. इतका प्रयत्न करून तुला शोधले. गोपाळभटांना धोका देणे शक्य नाही. ब्राह्मणाला धोका देऊन मी कुठे नरकात जाणार ? नाहीतरी जमीन तुला उपयोगाची नाहीच आहे. "
सुरेश इतका वेळ शांतपणे ऐकत होता. तात्यारावांच्या बायकोने चहा आणून ठेवला होता. सचिनचा ऑस्ट्रेलिया मधील फोटो भिंतीवर साईबाबा च्या बाजूला झळकत होता.
"बरोबर आहे. मी काय करणार जमीन घेऊन? गावं आल्यालाला १० वर्षं झाली. बाबा सुद्धा पुण्यातच वारले. सुदैवाने त्यांना हृदयविकाराचा झटका आला तेंव्हा ते पुण्यात होते. मी ताबडतोब हॉस्पिटल मध्ये नेले त्यानंतर त्यांना गावी जायलाच बंदी केली. हाच झटका इथे आला असता तर ते हकनाक गेले असते. "
"एक्दम खरं बोललास बग. सचिन म्हणतो मी का नाही पुण्या मुंबईत जात. पण आम्ही इथंच मरू. आमहाला नाही बा पुण्याला जायचं" असे म्हणून तात्याराव पुन्हा मोठ्याने हसले.
"तर तुझ्या दहा एकराच्या जमिनीला मी बाजारभावापेक्षा जास्त म्हणजे २५० रुपये देतो. म्हणजे सुमारे ११ लाख रुपये होतात. जमीन शेतजमीन आहे आणि आमच्या थोर सरकारने बळी राजाचे रक्षण करण्यासाठी जमीन बदलावर बंदी घातली आहे. त्यामुळे तू कितीही धडपड केलीस तरी जमीन १८० रुपयांपेक्षा जास्त मध्ये जाणार नाहीच त्याच वेळी जमीन तू फक्त शेतकऱ्यालाच विकू शकतोस. आता आमच्या रक्त देशांत ११ लाख मोजून जमीन घेणारे शेतकरी आहेतच किती ? "
"आता मी एकदा जमीन घेतली आणि मुख्य मंत्र्यांना त्यांची बॅग पोचली कि ते एक फोन करतील आणि रातोरात शेतजमीन कमर्शिअल मध्ये बदलेल. मग त्याची दर अव्वाच्या सव्वा होते. मान्य असेल टर्म इ पेपर्स रेडी ठेवले आहेत फक्त सही द्यायची बाकी मी पाहतो. "
सुरेशने मान हलवली.
तात्यारावांनी आंत जाऊन पेपर्स आणले. सुरेशने वाचीन सही मारली. तात्यारावांनी चेक लिहून दिला.
चेक खिशांत ठेवून सुरेश गाडी सुरु करून बाहेर आला.
गाडी सुरु करणार इतक्यांत गजानन मास्तर चालत येताना दिसले. "अहो पाव्हणं, तुम्ही इथं का ? कसा वाटला आमचा गांव ? लोकं इथली अतिशय सभ्य बर का तुमच्या शहराप्रमाणे नाही. आणि तात्याराव तर गावांत देवा सारखे. गावांत तो प्लांट जो जमीन बाळगायला पाहतोय ना त्याच्या विरोधांत त्यांनीच तर शड्डू ठोकलाय" त्यांनी माहिती दिली. सुरेश ने हसून मान हलवली.
पावूस कमी झाला होता आणि सुरेश च्या मनातील चलबिचल सुद्धा कमी झाली होती. पाऊस सुरेशला अश्यासाठी आवडत नव्हता कि जेंव्हा जेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा तेंव्हा सगळीकडे बदल होतो. मुले शाळा बदलतात, क्लास बदलतात, काही मुले पावसाच्या सुरवातीच्या दिवसांत शाळेतून कॉलेज मध्ये जातात, नवीन मित्र बनवतात तर आजूबाजूला जमीन सुद्धा रंग बदलते. हा बदल सुरेशला नेहमीच अस्वस्थ करत आलाय आणि त्यामुळे पाऊस पडला कि सुरेश अस्वस्थ होतो.
डोंगरी गावांतून बाहेर पडताना सुरेशला वाटले कि पाऊस पाहून किंवा फुलणारी एक कळी पाहून त्यांत रोमँटिक होणे माणसाला आवडते पण त्यातील सत्य पाहण्याची शक्ती मात्र फार कमी लोकांकडे असते. गांवातील लोक साधे भोळे आणि शहरातील लोक ठग असे वाटले तरी आपल्याच लोकांच्या पाठीत सूर भोकसणारे तात्याराव सगळीकडेच असतात. शेतजमिनीला विनाकारण चिकटवून सरकार आमचे रक्षण करील अशी आशा बाळगणारे गुलाम ब्रिटिश काळांत हतोय आणि स्वतंत्र भारतात सुद्धा आहेत. भकास होणारा गांव सुद्धा काही लोकांना सुंदर वाटतो. आणि नवीन रोजगार घेऊन येणारा प्रकल्प त्यांना वाईट वाटतो.
पाऊस सुदैवाने मानवी स्वभावासारखा नाही. बिचारा नेमेचि येतो (कधी कधी ) आणि आपले काम करून जातो.
-- समाप्त --